शनिवार, २३ जुलै, २०१६

पिवळ्या बाभळी





   प्रस्तावना 


          पूर्वीच्या काळी ग्रामीण जीवनाला सुख-समृध्दीची किनार होती. ग्रामीण संस्कृतीतूनच माणसाच्या जीवनाला फुलोर येत होता. गरीबी आणि श्रीमंती जगण्याचे हे दोन भाग असले तरी गरीब आणि श्रीमंतांमध्ये पूर्वी फारसा भेदभाव नव्हता. हे एकोप्याने नांदत असल्यामुळे तेव्हा बंधुभाव आणि एकात्मता टिकून होती. कालांतराने हे चित्र, हे जीवन बदलत गेले. माणूस स्वार्थी होत गेला. माणुसकी लोपत गेली. बंधूभावात तडा पडत गेला. ग्रामीण जीवन दारिद्रयामुळे, संकटांमुळे, परिस्थितीमुळे खडतर होत गेलं. याच खडतर जीवनाचा वेध कथालेखक संदीप गवई यांनी ' पिवळ्या बाभळी ' या आपल्या कथा संग्रहातील कथांमधून घेतला आहे. त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह आहे.

          या कथा संग्रहातील 'मोळी' ही कथा तुकारामच्या घरातील अत्यंत बिकट परिस्थितीचे चित्रण करणारी आहे. होळीचा दिवस, चूल पेटवायला घरात लाकडं नाहीत. त्यात होळी पेटवण्यासाठी गावातील मुलं लाकडं, गवय्रा मागायला येतात. पण तुकाराम मनावर घेत नाही. अहिल्याबाई, त्याची बायको नदीकाठावरून बाभळीची फरळ आणायला सांगते. कष्टानं तो मोळी घेऊन घरी येतो. घराबाहेर ठेवतो. पण रात्री अंगणातली मोळी मुलं होळ पेटवायला चोरुन नेतात. तुकारामला पेटत्या होळीत आपली मोळी जळत असल्याचं दिसतं आणि त्याचं मन पेटून उठतं. हांड्यातील पाण्यानं तो मोळी विझवतो अर्धवट जळालेली लाकडं घरी घेऊन येतो. उद्याची चूल पेटवण्यासाठी. ही मनाला अस्वस्थ करून जाणारी कथा आहे. 

          ' बाभूळ ' कथा झाडांविषयी बेईमान झालेल्या माणसाची आहे. जे झाडं आपल्याला सावली देतं, शुद्ध, हवा देतं, लाकूडफाटा देतं, त्या झाडांविषयी बद्रीनाथचा कृतघ्नपणा गौतमला पाहावत नाही. खरं म्हणजे ती बाभळी बद्रीनाथच्या मालकीची असते. मजुरांकडुन तो तोडून घेत असतो. मात्र झाडं तोडणं हे पाप आहे  अशा सात्विक भावनेनं गौतम झाडं तोडू देण्यास विरोध करतो. याला दुसरं कारण असही की, त्या बाभळीशी त्याच्या जीवनातील त्याच्या सुखद आठवणी जुळलेल्या असतात. तोडलेल्या जागेवर गौतम दोन लिंबाच्या झाडाचे रोपटे लावून झाडांविषयी आपली आत्मियता प्रकट करतो. झाडांविषयी सद्भावना असणारी ' बाभूळ ' ही कथा चिंतन करायला लावणारी आहे. 

          दारिद्र्याचं विदारक दृष्य समोर आणून ठेवणारी संदीप गवई यांची ' दुष्काळ ' ही कथा वाचकांच मन हेलावून टाकते. इंदराबाईची हलाखीची परिस्थिती तिला अम्रपाली आणि शारदा ह्या दोन मुली. नवरा भुजंगा मात्र दिवसरात्र दारुच्या नशेत. बाजीराव ह्या कुटुंबाला गिट्टी फोडण्याचं काम करण्यासाठी बाहोरगावी नेतो. इंदराबाई पोटाची खळगी भरण्यासाठी दगडांवर घाव घालते आणि भुजंगा तिच्या कष्टाच्या कमाईवर पोटात दारू ढोसतो. म्हणून-सवरून तो कसातरी सावरतो. पाषाण फोडण्याचं काम करतो. मात्र एक दिवस पाषाणाची चिपलंगी उडून आम्रपालीच्या डोक्याला लागते. आम्रपालीच्या शरीरातला जीव निघून जातो. दुष्काळापायी आम्रपालीचा जीव गमावून बसलेल्या या कथेचं कथाकथन पाषाण हृदयालाही पाझर फोडायला लावनारं आहे.

          प्रस्तुत संग्रहातील सर्व कथा जीवनातील कारुण्याचे दर्शन घडविणाय्रा आहेत. संदीप गवई यांचा हा पहिलाच कथासंग्रह असला तरी त्यांच्या कथांमधून ग्रामीण वास्तव समर्थपणे अधोरेखित होते. त्यांच्या कथांमधिल पात्र उपेक्षित आणि गांजलेलीसुध्दा आहेत. वास्तवातील दाहकता शोषून जीवनाला सामोरे जाण्यास्तव ही पात्रे धडपडतांना दिसतात. कथेच्या संवादासाठी गवईंनी वापरलेली ग्रामीण भाषा जीवनमूल्य आणि कथनमूल्याला साकार करण्यासाठी सार्थ ठरते. कथेची विविध रुपे पेलणारा हा कथासंग्रह दु:खाची चिरंतनता सांगणारा आहे. 

          म्हातारपणी माणूस किती परावलंबी होऊन जातो. जवळची संपत्ती मुलांना देऊन टाकल्यावर त्यांच्या बायकांपुढे माणूस हतबल होऊन जातो. तो त्यांच्या हातचं खेळणं बनतो. ' म्हातारपण ' या कथेत गबाजीराववर अशीच पाळी येते. तो चहासाठी मौताज होवून जातो.....'' जिवाले जराशिक लाजवी वाटत नाही माय त्याच्या तं... कुठी जन्माले आल्तं कान्नुमाय म्हसाडतोंड ? निरामाय खायालेच उठते.... आधल्या जल्माचा राकेश... '' अशा शब्दांचे व्रण सासऱ्याच्या मनावर उमटल्यावर त्याला जीवनाविषयी काय सारस्य राहील? निराधार व्यक्तीचं म्हातारपण उजागर करणारी ही कथा परिस्थिती शरणतेचं उदाहरण आहे. 

   

          माणूस माणुसकी सोडून वागल्यावर तो माणूस म्हणायच्या लायकीचा तरी राहतो का?  याचाच प्रत्यय  ' बाई ' या कथेत येतो. एक असाह्य गरिब बाई आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन आपल्या गावाला जाण्यासाठी रुपया दोन रूपयाच दान मागीत असते. तरुण टोळकं तर जाऊ द्या पण शिकली सवरलेली, स्वत:ला साहेब म्हणवून घेणारी माणसं त्या बाईची लाज वेशीवर टांगतात. तिला मदत करणारे तर दुर तिच्या इभ्रती बद्दल बोलतात. गवईची ' बाई ' ही कथा माणसातलं माणूसपण किती हरवत चाललेलं आहे हे दर्शविणारी आहे. 

          ' दैवताचा खून ' या कथेत बाबुरावला भागवतचे कबूल केलेले पैसे द्यायचे असतात. त्याच्या बायकोचा गिरजाबाईचा भाऊ मदत करण्यास नकार देतो. पावसानं दगा दिला नसता तर सोयाबीन जळाली नसती. मग भागवतचं कर्ज देणं सोयीचं झालं असतं. अशा स्थितीत बाबुराव एखादा बैल विकून टाकण्याचा विचार करतो. पण बैलाला दैवत समजणारी गिरजाबाई बैल विकू देत नाही. सुनील बैलांना चारायला नेतो. एका ट्रकची धडक लागून बैल मरतो. भागवतचं कर्ज अंगावरच राहतं आणि बैलाचं... दैवताचं मरण डोळ्यासमोर दिसतं. अशा आशयाची ही कथा शेतकऱ्यांचं कोळपत चाललेलं जीवन प्रकट करणारी आहे. 

          ग्रामीण जीवनाच्या परिवर्तनाचा प्रश्न फार गहण आहे. खेड्यातली माणसं दिवसभर राबतात. शेती-मातीत आपलं जीवन व्यतित करतात. एवढं करूनही त्यांच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळत नाही. यामुळेच अनेक परिस्थीतीच्या भोवय्रात त्यांचं जीवन गुंतूंन पडतं. या सर्वस्वाची जाण संदीप गवई या लेखकाला आहे असे त्यांच्या कथांमधून दिसून येतं. या लेखकाचं अनुभव विश्व लहान असो वा मोठं हा भाग आपण काहीसा बाजूला ठेवू या. कारण प्रत्येकाचं अनुभव विश्व आपापल्या परीने असतं. मात्र त्यांनी प्राप्त केलेल्या अनुभवविश्वातून त्यांच्या कथाकथनाला वास्तवाची भावनिक किनार आहे. वेगवेगळे पैलू आहेत हे सिध्द होते. तसेच या कथामधिल बोलीभाषामुळे ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. प्रसंग, घटना आपल्यासमोर घडते आहे असे वाटून जाते. 

          ' पिवळ्या बाभळी ' या कथा संग्रहातील ' सोयरीक ' या कथेतील सविता तिच्या प्रियकराची खोड जिरवते. राजूच्या स्वार्थी प्रेमाला मनातून हद्दपार करते. ' बळी ' या कथेत बळीरामाच्या बळी दिल्याचं हृदयद्रावक चित्रण आहे.  ' एक पाऊस ' ही एक लालित्यपूर्ण कथा आहे.  ' आंगडं ' या कथेला आणि  ' भरोसा ' कथेलाही वास्तववादी स्पर्श आहे. 

          संदीप गवई यांच्या सर्वच कथा वाचनीय असून वाचकांच्या मनाची पकड घट्ट धरून ठेवणाय्रा आहेत. या कथा विषय, आशय सोडून इतरत्र सैरभैर होत नाहीत हे कथांचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कारण लेखकाजवळ कथाशैली, व्यक्तिचित्रण करण्याचे कसब, जीवनवास्तवाचा वेध घेण्याची प्रवृत्ती आहे. या कथालेखन गुणांमुळे त्यांचा हा कथासंग्रह उत्कृष्ट ठरेल असा विश्वास वाटतो. 

- सुरेश पाचकवडे 
' शिवदया ', 
राऊतवाडी, अकोल       

पुस्तकाचे नाव- पिवळ्या बाभळी 

लेखक- संदीप गवई 

प्रथमावृत्ती- एप्रिल २०१५

प्रकाशक- सुपर्ण प्रकाशन , पुणे

पृष्ठे - १५६

किमंत- २०० रूपये

पुस्तक खरेदी करण्यासाठी लेखकाला खालील पत्त्यावर संपर्क साधा.

संदीप निवृत्ती गवई 
इंदीरा नगर, मेहकर, ता. मेहकर 
जि. बुलढाणा 
पिन- ४४३२०१
भ्रमणध्वणी- ९०११७८८९२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा